निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार फौजदारी गुन्हे!
निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार फौजदारी गुन्हे!
नवी मुंबईतील अंतर्गत शाळाप्रमुखांना अंतिम इशारा
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने निवडणूक कामासाठी नियुक्त असूनही गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांची महापालिका प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या सूचनेनुसार, ८ जानेवारी रोजी ज्ञानकेंद्र, नवी मुंबई महापालिका मुख्यालय येथे १०१ शाळांच्या प्रमुखांची तातडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत निवडणूक कामावर हजर न झालेल्या ४५१ कर्मचाऱ्यांबाबत कठोर भूमिका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे आणि शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी या बैठकीत निवडणूकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे स्पष्ट करीत हे काम करणे अनिवार्य असल्याचे शाळाप्रमुखांना स्पष्ट केले आहे.
निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार, संबंधित १०१ शाळांमधील जे कर्मचारी अद्याप निवडणूक कामासाठी हजर झालेले नाहीत, त्यांना त्यांच्या आदेशात नमूद केलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आजच दुपारी २ वाजेपर्यंत हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे कर्मचारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत कर्तव्यावर रुजू होणार नाहीत, त्यांची नावे तात्काळ प्रशासनाला कळवण्याच्या सूचना शाळाप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या गैरहजर कर्मचाऱ्यांच्या यादीनुसार, निवडणूक कर्तव्यात बाधा निर्माण केल्याप्रकरणी या सर्व कर्मचाऱ्यांवर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या बैठकीप्रसंगी मार्गदर्शन करताना शिक्षण विभागाच्या उपायुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांनी नमूद केले की, शासन निर्णयानुसार लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काम हे सर्व प्रकारच्या व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे. पाच वर्षातून एकदा प्रशिक्षणाचे दोन दिवस आणि प्रत्यक्ष निवडणुकीचे दोन दिवस देऊन लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग नोंदवणे हे प्रत्येक कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी हे काम अत्यंत महत्त्वाचे असून सर्व अनुपस्थित कर्मचाऱ्यांनी कोणतीही कठोर कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्वरित आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहावे, असे आवाहनही या बैठकीमध्ये करण्यात आले.
