Breaking News

सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रस्थापितांची वतनदारी मोडून काढा

सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रस्थापितांची वतनदारी मोडून काढा

निवडणूकीनिमित्त नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापले...

उपमुख्यमंत्री शिंदेंचे थेट नवी मुंबईत नाईकांना आव्हान...

नवी मुंबई (प्रतिनिधी)- नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या प्रचारानिमित्त नवी मुंबईत राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विशेषकरून शिवसेना व भाजप हे दोन पक्ष नवी मुंबईची महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढत असल्याने दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडण्यासह प्रचाराप्रसंगी आवाहन दिले जात आहे. त्याचाच प्रत्यय काल बेलापूर येथील शिवसेनेच्या प्रचार रॅलीप्रसंगी आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी रॅलीप्रसंगी जनसंबोधन करतांना, थेट नवी मुंबईत सत्ता परिवर्तन घडवण्याचे आवाहन मतदारांना करून एकप्रकारे नामदार गणेश नाईक यांना आवाहन दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीस बेलापूर सीएनजी पंप येथून सुरुवात होवून, बेलापूर गाव, आयकर कॉलनी, दारावे गाव, नेरूळ बस डेपो, अयप्पा मंदिर, शिवसेना शाखा ११, शिरवणे गाव, राजीव गांधी ब्रिज, नेरूळ पश्चिम (सेक्टर ८, स्टेशन रोड, सेक्टर १०) गावदेवी मैदान, सेक्टर ६, सेक्टर १८, सीड मॉल, से ५०, गणेश मैदान (सेक्टर ४८), करावे गाव, से-४, जुईनगर, सानपाडा, पामबीच रोड, वाशी गावदेवी मंदिर, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, नवी मुंबई अशा मार्गाने ही रॅली उत्साहात पार पडली. यावेळी जागोजागी मोठमोठे हार घालून फुलांची उधळण करून एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. विशेष करून लाडक्या बहिणी आणि आबालवृद्धांचा या रोड शोला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नवी मुंबई महापालिकेची ही निवडणुक यंदा विकास विरूध्द भूळथापा, सेवक विरुद्ध वतनदारी अशा थेट संघर्षाची असल्याचे नमूद केले. महापालिका निवडणुकीत सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रस्थापितांची वतनदारी मोडून काढा. कारण काही जण स्वतःला मालक आणि जनतेला गुलाम समजतात अशी टिकाही त्यांनी नामदार गणेश नाईक यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली. मात्र आम्ही नोकर आहोत, जनता जनार्दन आमचा मालक आहे. जनतेशी पंगा घेणाऱयांचा शेवट काय होतो, हे २०२२ मध्ये आपण दाखवून दिले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. त्यामुळे येत्या १५ तारखेला धनुष्यबाण चिन्हाचे दाबून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून नवी मुंबई मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवा असे आवाहनही त्यांनी नवी मुंबईकरांना केले.

नवी मुंबईतील विविध विकास प्रकल्प मार्गी लावून हक्काचे घर, हॉस्पिटल, गार्डन, चांगले रस्ते, पाणी अशा सर्व मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्याची हमी याप्रसंगी दिली. या भागातील गरजेपोटी बांधलेली घरे, पुनर्विकास आदी सर्व कामे नगरविकास विभागाच्या माध्यमातून मार्गी लावू, नवी मुंबईचा सर्वांगीण विकास करताना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. यावेळी उबाठा गटातील केशव नलावडे, सुनील घुले, भरत मोरे, तसेच युवासेनेचे रोहित नलावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या रॅलीप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, द्रारकानाथ भोईर, अंकुश कदम, शिवसेनेचे उमेदवार तसेच नवी मुंबईतील इतर शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Most Popular News of this Week