Breaking News

नवी मुंबई मनपा निवडणूकीसाठी भाजपचा जाहिरनामा प्रसिध्द

नवी मुंबई मनपा निवडणूकीसाठी भाजपचा जाहिरनामा प्रसिध्द

पुढील २० वर्ष पाणीपट्टीसह घरपट्टी करवाढ नाही

पाणीपुरवठ्याच्या कायमस्वरूपी तरतूदीसाठी घेणार आणखी एक धरण

नवी मुंबई (प्रतिनिधी) - राज्याच्या सत्तेत वाटकरी असलेले महायुतीमधील भाजप व शिवसेना (शिंदे) हे मित्र पक्ष राज्याच्या इतर महापालिका निवडणूकींचा अपवाद वगळता, नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या रणागणांत एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. नामदार गणेश नाईक हे ज्या पक्षात कार्यरत असतात, त्या पक्षाची नवी मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता राहिल्याचा आजवरचा इतिहास आहे. त्यात विशेष बाब म्हणजे ना.गणेश नाईक हे सध्या भारतीय जनता पक्षात कार्यरत असल्याने नवी मुंबई महापालिकेची यंदाची ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. सध्या नाईकांचा संघर्ष हा नगरविकास खात्याच्या निर्णयांविरोधात असल्याचे दिसून येते. नवी मुंबईतील सार्वजनिक भुखंड, सिडकोच्या गृहनिर्माण संस्थांचे भुखंड, वाढीव एफएसआय, पूनर्विकास, गरजेपोटीची घरे आदी निर्णय नगरविकास खात्याशी संबंधीत आहेत. भविष्यातही आपण शहरासाठी संघर्ष करत राहू असेही नाईक यांनी जाहीर केले. महापालिकेची ही सत्ता काबीज करण्यासाठी भाजप पक्ष ताकदीने या निवडणूकीच्या रणांगणात उतरला आहे. त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्याहस्ते काल भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. नवी मुंबईमध्ये नागरी वस्तीतील घरांची घरपट्टी आणि पाणीपट्टी पुढील वीस वर्ष वाढू देणार नाही असं महत्वाचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. तसेच या जाहीरनाम्यात प्रामुख्याने पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी तरतूद करण्यासाठी आणखी एक धरण घेणार, झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास महापालिकेच्या माध्यमातून करणार, इमारतींच्या स्वयं पुनर्विकासाला चालना देणार, महिला, युवा,जेष्ठ नागरिक यांच्या कल्याणाच्या योजना जाहीर करण्यासह जनरेशन नेक्स्टसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

याप्रसंगी माजी खासदार तथा निवडणूक प्रमुख डॉ.संजीव नाईक,नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश पाटील, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. ना.गणेश नाईक यांच्या नेतृत्वात नवी मुंबई राज्यामध्ये विकासाच्या बाबतीत एक पाऊल पुढे असल्याचे सांगून दूरदृष्टीने विकासाची धोरणे राबवून नामदार नाईक यांनी नवी मुंबईचा विकास केल्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यावेळी नमूद केले. नवी मुंबईच्या विकासाचे पुढचे तीस वर्षाचे व्हिजन तयार केल्याची माहिती नामदार गणेश नाईक यांनी यावेळी दिली. नवी मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता नवी मुंबईच्या पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी तरतूद करण्यासाठी पोशीर धरण बांधण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले. २५ वर्षे मालमत्ता कर किंवा पाणीपट्टी वाढवणार नाही असा शब्द दिला होता तो पाळला. आता पुढील वीस वर्षे देखील मालमत्ता आणि पाणीपट्टी वाढवणार नाही असे ते म्हणाले. कर वाढ न करता ही शहराचा विकास होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सिडकोची घरे भाडेपट्ट्यावर न ठेवता फ्री होल्ड केली जातील. गरजे पोटीच्या घरांना आकारण्यात येणारी तिप्पट शास्ती रद्द करणार असल्याचेही ते म्हणाले.

भाजपच्या या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासनांमध्ये प्रामुख्याने १०० खाटांचा अतिदक्षता विभाग आणि ५०० खाटांचे नवीन रुग्णालय सुरु करणार, पीजी ते केजी शिक्षण मोफत देणार, नागरिकांच्या मागणीनुसार इंग्लिश आणि सीबीएसई माध्यमाच्या अतिरिक्त शाळा सुरू करणार, नवी मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी ५०१ ते ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना ६० टक्के कर सवलत, सिडको सोसायट्यांमध्ये गरजे पोटी झालेली वाढीव बांधकामे नियमित करणार, नवी मुंबई परिवहन सेवेमधून ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवासाची सुविधा कायम ठेवणे, महापालिकेची सर्व रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासह जर्मन तंत्रज्ञानावर आधारित ऑपरेशन थिएटर्स टप्प्याटप्प्यात रुग्णालयांमधून स्थापित करणार या मुद्यांचा तसेच घणसोली ते ऐरोली पामबिच मार्गाचे, तुर्भे ते खारघर रस्ते प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे . कोपरखैरणे ते विक्रोळी असा नवी मुंबईतून मुंबईत जाण्यासाठी उड्डाणपूल प्रस्तावित आहे तो देखील लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी प्रयत्न करणार, वाहतूक कोंडीच्या भागांमध्ये मल्टीलेव्हल पार्किंगची सोय, बिल्डर विरहित झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास जमिनीच्या मालकीसह झोपडपट्टी बांधवांना जमिनीच्या मालकी हक्कासह मोठी सुविधायुक्त घरे देणार, तसेच जमिनीच्या मालकीसह एकसमान परवडणारा दर आकारून प्रकल्प ग्रस्तांची घरे नियमित करणार, महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी त्यांच्या रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी महापालिकेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करणार, युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र निर्माण करणे, नवी मुंबईतील सर्व तलाव सुरक्षित केले जातील, शहरातील हवामान शुद्ध रहावे यासाठी झिरो डस्ट पॉलिसी राबविण्यावर भर दिला जाईल, विरंगुळा केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल, सोलर ऊर्जा प्रकल्प हाती घेण्यात येईल अशा महत्वाच्या घोषणांचा समावेश करण्यात आला आहे. यासह जनरेशन एक्स, वाय, अल्फा, मिलेनियलसाठी कम्युनिटी को-वर्किंग स्पेस तसेच आधुनिक एआय को वर्किंग, कंटेन्ट क्रियेटिव्ह स्टुडिओ, कम्युनिटी को-वर्किंग स्पेस,वर्क-फ्रॉम-होम, स्टार्टअप्स व डिजिटल कामांना चालना. लास्ट माइल कनेक्टिविटी. ई-साइकिल,ई-स्कूटर और फीडर बस सेवा. पार्किंग बुकिंगसाठी डिजिटल सुविधा. "स्ट्रेस रिलीफ'सेंटर्स.आधुनिक शिशुगृह उभारणे आदींचा समावेश करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वक्कतव्याबाबत ना. गणेश नाईकांकडून प्रत्युत्तर

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई शहराबाबत नुकतेच आपल्या प्रचारदौऱ्यादरम्यान केलेल्या वक्तव्याचा नामदार गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचे प्रत्यक्ष नाव न घेता त्यांच्यावर टिकेचा निशाणा साधत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, प्रशासकीय राजवटीत नवी मुंबईचे वाटोळे झाले. तेव्हा नेतृत्व कोण करत होते हे, मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. नवी मुंबई हे शहर वर वर दिसायला सुंदर आहे, असं काही लोक म्हणतात. मग पाच वर्षे तुम्हीच नेतृत्व करत होता ना, असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला. महापालिकेवर सत्ता आल्यानंतर गत ५ वर्षात निघालेली टेंडर, त्यांची पध्दत आदीबाबतचा हिशोब मागणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. सिडको इमारत पुनर्विकासाबाबत बोलतांना त्यांनी चिंता व्यक्त केली. भविष्यात येथे सायकल तर सोडा माणसांना चालण्यास जागा शिल्लक राहणार नसल्याने नवी मुंबईची नियोजीत शहराची ओळख पुसली जाण्याची भीती व्यक्त केली.


Most Popular News of this Week