निवडणूक उमेदवारीच्या अखेरच्या क्षणी... निष्ठावंतांच्या हाती बंडाचा झेंडा!
निवडणूक उमेदवारीच्या अखेरच्या क्षणी... निष्ठावंतांच्या हाती बंडाचा झेंडा!
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापलिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी काल अर्ज भारण्याच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षाच्या इच्छुकांचा पक्षातर्फे ऐनवेळी अपेक्षाभंग झाल्याने या नाराज बंडखोरांनी आपली पक्ष निष्ठा सोडून देत अखेर बंडाचा झेंडा हाती घेण्यात धन्यता मानली. निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदे सेनेतील माजी उपमहापौर अशोक गावडे, माजी नगरसेवीका अँड. स्वप्ना गावडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
नवी मुंबईमध्ये शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. शिंदे सेनेतून उमदेवारी निश्चीत असलेल्या माजी नगरसेवीका अँड. स्वप्ना गावडे यांनी अचानक भाजपामध्ये प्रवेश केला आहे. हा शिंदेसेनेला धक्का समजला जात आहे. भाजपाचे महामंत्री व युवा मोर्चोचे जिल्हा अध्यक्ष दत्ता घंगाळे यांनाही तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. नेरूळ गावामधून उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या देवनाथ म्हात्रे यांनीही राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये उमदेवारीवरून आमदार मंदा म्हात्रे यांचा गट नाराज झाला आहे. अनेकांनी बंडखोरी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळावर अर्ज भरला आहे. तुर्भे गावातील शिवसेनेचे शिंदेगट युवा नेते आतीश सोमनाथ पाटील यांनी पत्नीसाठी शिवसेना (उध्दव ठाकरे) गटाची उमेदवारी घेतली आहे. माजी शिक्षण मंडळ सभापती दिलीप तिडके यांनीही राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार गटातर्फे उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपतर्फे आ.मंदा म्हात्रे समर्थक १३ कार्यकर्त्यांनी आपणास जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश पाटील यांनी एबी फॉर्म देवून ऐनवेळी फसवणूक केल्याचा आरोप केला. यामध्ये विकास सोरटे, प्रविण भगत, चिंतामण बेल्हेकर, पांडुरंग आमले, जगन्नाथ जगताप, राजू तिकोणे, महेंद्र नाईक, तेजस्वी म्हात्रे, ज्योती पाटील, प्रमोद जोशी, संतोष कोळी, निलेश म्हात्रे, आशा शिंदे यांचा समावेश आहे. यापैकी काहींनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीखेपर्यंत (२ जानेवारी) कोण बंड कायम ठेवतो आणि कोण पक्षाचा आदेश पाळतो हे स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी युवा काँग्रेस (श.प.) अन्नू आंग्रे यांनी काल शिवसेना शिंदे गटातर्फे अर्ज भरला आहे. तर काँग्रेसचे इंटक नवी मुंबई अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवारी अर्ज भरत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
