Breaking News

सानपाडा वडार भवनमध्ये निष्ठावंतांनी फुंकले रणशिंग... भाजप कार्यकर्त्यांमध्ये आता घराणेशाहीवरून धुसफूस!

सानपाडा वडार भवनमध्ये निष्ठावंतांनी फुंकले रणशिंग... भाजप कार्यकर्त्यांमध्ये आता घराणेशाहीवरून धुसफूस!

आ.मंदा म्हात्रेसह भाजप नेतृत्वाचा केला निषेध

सानपाडा (प्रतिनिधी) - विधानसभा, लोकसभा निवडणूकांच्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या विजयासाठी आणि पंतप्रधान मोदींच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांनाच आता ऐन महापालिका निवडणुकीत दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवारांचे काम करावे लागणार असेल तर आम्ही सहन करणार नाही, पक्षाची विचारधारा मानणारे, पक्षीय ध्येयधोरणांचे कार्यक्रम राबविणाऱ्यांना उमेदवारी द्यावी या प्रमुख मागणीसाठी काल वाशी-सानपाडा प्रभाग -१८ मधील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी रणशिंग फुंकले.

निष्ठावंत विरूध्द पक्षात आलेले आयाराम अशा या लढाईचा रोष प्रामुख्याने या प्रभागातील माजी नगरसेवक दशरथ भगत यांच्या कुटूंबासाठी भाजपतर्फे मिळणाऱ्या संभाव्य उमेदवारीविरूध्द होता. दशरथ भगत यांनी पक्षाकडे कुटूंबासाठी चार-पाच तिकीटे मागितल्याचा या कार्यकर्त्यांचा आरोप होता. सानपाडा वडार भवनमधील या सभेनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात जावून आपल्या भावना व्यक्त केल्या. आमच्यावर होणाऱ्या या अन्यासासाठी आम्ही आमदार मंदा म्हात्रे, जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश पाटील, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आदींचा निषेध करत असल्याचे यावेळी भाजपचे खंदे कार्यकर्ते व या प्रभागात यापूर्वी भाजपतर्फे लढणाऱ्या चिंतामन बेल्हेकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले.

यावेळी प्रसारमाध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त करतांना भाजपचे पदाधिकारी सतिश निकम म्हणाले की, प्रभाग क्रं.१८ मध्ये सध्या परिवारवाद सुरु असून तो मुक्त झाला पाहिजे. एकाच कुटूंबातील चार चार लोक उमेदवारीची मागणी करत आहे. महिलांच्या आडून त्यांचे पती कारभार पाहत आहे. एका वर्षापूर्वी ते भारतीय जनता पक्षात आले. मात्र पक्षाचे कोणतेच ध्येय धोरण त्यांनी मान्य केले नाही. ना त्यांनी प्रभूरामचंद्र यांच्या अयोध्या राम मंदिराचा आनंदोत्सव साजरा केला, ना त्यांनी कलम ३०७ रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले. पंतप्रधानांचा जन्मदिवस भाजपमधील सर्वसामान्य कार्यकर्ते विविध सामाजिक उपक्रमांव्दारे साजरा करतात. मात्र प्रभाग क्रं.१८ मधील तथाकथित नेते आहेत, त्यांना आम्ही कधी हिंदूत्वादी विचारसरणीच्या कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे पाहिले नसल्याची टिकाही त्यांनी यावेळी दशरथ भगत यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली याउलट भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मागील १० ते १५ वर्षापासून दारोदार जावून भाजपकरिता मत मागण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे सध्या त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत त्यांच्या मनात दु:ख आहे, महापालिकेत जाणारा जनसेवक हा आमच्या विचारांचा असायला हवा. बांग्लादेशीयांचे प्रस्थ वाढविणारा नसावा अशा भावना व्यक्त करून पक्ष नेतृत्वाला जागे करण्यासाठी हे रणशिंग फुंकले असल्याचे यावेळी सतीश निकम यांनी सागितले.

या कार्यक्रमानंतर सानपाडा प्रभाग क्रं.१८ मधील भाजपा कार्यकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाने भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात जाऊन प्रदेश कार्यालय प्रमुख मुकुंद कुलकर्णी यांची भेट घेतली व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नावे लिहिलेल्या पत्रातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते पत्र त्यांना सादर केले. यानंतर कुलकर्णी यांनी त्वरीत सदरचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना ईमेल केले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना दिलासा दिला की, कार्यकर्त्यांच्या भावना समजूनच पक्षाकडून निर्णय घेतला जाईल.


Most Popular News of this Week