नवी मुंबईत शिंदेसेनेत घराणेशाहीचे ग्रहण?
प्रस्थापितांना हवेत कुटूंबात तीन ते चार तिकीटे
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सार्वजनिक कार्यक्रम असो अथवा निवडणूक काळातील सभा असो, अशा विविध कार्यक्रमांमधून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या घराणेशाहीवर तोंडसुख घेण्याची एकही संधी न सोडणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरही आता ऐन महापालिका निवडणूकीनिमित्त इच्छुकांकडून उमेदवारीच्या मागणीवरून होणाऱ्या घराणेशाहीचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका निवडणूकीत घराणेशाहीचा मुद्दा गाजणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्यातील महापालिका निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर नवी मुंबईसह इतर सर्वच महापालिका कार्यक्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहत गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुकांच्या इच्छा-आकांक्षा पुन्हा एकदा उफाळून आल्याचे दिसून येत आहे. यात नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी शिवसेनेतील काही इच्छूकांकडून आपल्या घरात एक नव्हे तर चार चार उमेदवारी देण्याची मागणी पक्ष नेतृत्वाकडे केळी जात आहे. विशेषकरून आपल्या घरातील एकापेक्षा अधिक सदस्यांना उमेदवारी मिळावी यासाठी इच्छूकांकडून पक्ष नेतृत्वाला ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार होत असल्याची चर्चा बाहेर येतांना दिसत असल्याने भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर घराणेशाहीवरून हल्लाबोल करणाऱ्या शिंदे सेनेला आता घराणेशाहीचे ग्रहण लागल्याचे बोलले जात आहे. मात्र असे असले तरी पक्ष नेतृत्व, एकाच घरात अनेकांना उमेदवारी देण्याची मागणी करणाऱ्यांच्या बाबतीत काय निर्णय घेतात, हे येत्या काळात जाहीर होणाऱ्या उमेदवारीवरून लवकरच स्पष्ट होईल.
आपल्याच घरात एकापेक्षा अनेक सदस्यांना उमेदवारी देण्यात यावी याबाबत प्रामुख्याने अनेकांची नावे समोर येतांना दिसत आहेत. कोपरखैरण्यातील माजी नगरसेवक शिवराम पाटील, घणसोलीतील माजी नगरसेवक प्रशांत पाटील व सानपाड्यातील माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर ह्या सर्व माजी नगरसेवकांच्या घरात यापूर्वी दोन नगरसेवक राहिलेले असतांना उपरोक्त सर्वांकडून आपल्या घरातील चार जणांना उमेदवारी देण्याची मागणी झाल्याचे सूत्रांकडून समजते. उबाठा शिवसेनेतून नूकतेच शिंदे सेनेत कुटुंबातील सदस्यांसह दाखल झालेल्या ऐरोलीतील माजी नगरसेवक एम.के.मढवी यांच्या घरात यापूर्वी तीन जण नगरसेवक असतांना आता, मढवी यांच्याकडुन ४ जणांना उमेदवारी हवी अशी मागणी आहे. अविनाश लाड यांच्या घरातही यापूर्वी एक नगरसेवक राहिलेले असतांना, त्यांच्याकडून आता दोन उमेदवारीची मागणी केली जात आहे. तसेच इतरही असंख्य इच्छूकांकडून अशा स्वरूपाची मागणी होतांना दिसत आहे. एकंदरीत ज्या घरातील सदस्यांनी यापूर्वी नगरसेवक पद भूषविले आहे, अशांकडून घरातील एकापेक्षा जास्त सदस्यांना उमेदवारी देण्याची मागणी होतांना दिसत आहे.
...तर त्यांनी स्वत:ची ताकद दाखवावी!
आपल्याच घरातील इतर सदस्यांना पुन्हा उमेदवारी मिळावी याबाबतची मागणी करणाऱ्यांच्या भूमिकेबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व्दारकानाथ भोईर यांनी नुकतीच प्रसारमाध्यमांसमोर तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करत त्यांचा समाचार घेतला. पक्षात अशा मागणीसाठी ब्लॅकमेलिंग होण्याचे प्रकार होत नसून, पक्ष नेतृत्व याबाबत निर्णय घेण्यास सक्षम आहे. मात्र एकाच घरात चार तिकीटांची कुणी मागणी करून ब्लॅकमेलिंग करत असेल तर त्यांनी स्वत:च्या बळावर घरातील चार ते पाच उमेदवारांना निवडणूकीच्या रिंगणात उभे करून निवडून आणण्याची ताकद दाखवावी असा खोचक सल्ला त्यांनी दिला.
