राष्ट्रवादी पक्षात ताकद न मिळाल्यानेच शिवसेनेत जाण्याचा निर्णय!
राष्ट्रवादी पक्षात ताकद न मिळाल्यानेच शिवसेनेत जाण्याचा निर्णय!
मी खोके, आंब्याच्या पेट्या घेऊन पक्षात आलो नाही...
शिवसेना प्रवेशानंतरच्या टिकेबाबत नामदेव भगत यांचे प्रत्युत्तर
नवी मुंबई (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी पक्षात जशी मला ताकद, सपोर्ट मिळायला हवा होता, तसा न मिळाल्याने मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. मी पक्ष प्रवेशासाठी आंबे, खोके व पेट्या पण घेतल्या नाहीत असे नामदेव भगत यांनी नेरुळ येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ऐरोलीत रविवारी पार पडलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन मेळाव्याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीचे (अप) पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. पक्षांतरानंतर भगत यांच्यावर सध्या विविध स्तरातून टिका होत असल्यामुळे याविषयी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी काल नेरुळ से-२८ येथील कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी नामदेव भगत पुढे म्हणाले की, पक्ष बदलला की काही लोक आपपल्या परीने चर्चा करत असतात. मला काँग्रेसने भरभरून दिले. पक्षांतरानंतर माझ्यावर टिका करणाऱ्यांचे मी नाव घेत नाही कारण मला कुणाला बदनाम करायचे नाही. मी सुरूवातीला उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात असतांना त्यावेळी निवडणूक काळात तिकीट वाटपात आपल्यावर अन्याय झाला होता असेही यावेळी त्यांनी नमुद केले. निवडणूका आल्या की दरवेळी माझ्या प्रभागात बदल होत असतो असेही त्यांनी सांगितले. माणूस सायकलवर असल्यावर कुणी लक्ष देत नाही. मात्र अचानक गाडी घेतल्यावर गाडी कुठून घेतली अशी चर्चा होत असते. मी शिवसेनेत असताना उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, मात्र त्यावेळी मला काही गोष्टी न पटल्याने शिवसेना सोडली व त्यावेळी अजितदादांनी मला फोन करून पक्षात येण्यास सांगितले. त्यानुसार मी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला होता. या पक्षात चार वर्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माझ्याकडे होते. प्रतिकुल परिस्थिती पक्षासमोर असतांना मी पक्षात काम करत होतो. दादांचे माझ्याकडे लक्ष होते. मात्र काहींचे नव्हते. असे सांगतानाच राजकीय किंवा शासकीय ताकद मला जशी मिळायला हवी होती, तशी मला राष्ट्रवादीत मिळाली नसल्याची खंत व्यक्त करतानाच पक्षाला आपल्यामुळे अडचण नको म्हणून मी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला व याबाबतची कल्पना मी अजितदादा यांना दिली होती असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे मध्यंतरी माझ्या मुलीने व जावयाने शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सर्व कुटूंब एकत्र आल्यास चांगले काम करता येईल या भावनेतून मी शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे नामदेव भगत म्हणाले. आज शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. नवी मुंबईत सर्वच वरिष्ठ पदाधिकारी चांगले काम करत आहेत. त्यामुळे सर्वजण एकत्र आल्यास पक्षासह आपली ताकदही वाढेल म्हणून मी शिवसेनेत दाखल झालो. जिथे आपली किंमत व मानसन्मान नसेल तिथे जाण्यापेक्षा आपली झोपडी कुठेतरी बांधून काम करावे म्हणून शिवसेनेत आलो, असही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नामदेव भगत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला. आपल्याला भेटण्यास आलेला शेवटचा माणूस जाईपर्यंत ते काम करत असतात. ते फार कमी बोलतात. जेव्हा गरज असेल तेव्हाच बोलतात. कार्यकर्त्याला समजून घेतात. त्यामुळे मेहनत घेणाऱ्या व शब्दाला जागणाऱ्या व लोकांचे अश्रू पुसणाऱ्या नेत्यासोबत जाण्याचे मी ठरविले असल्याचे त्यांनी सांगितले.
