Breaking News

नमुंमपा अतिरिक्त शहर अभियंता व शहर अभियंतापदी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी नसलेल्या व्यक्तींची नियुक्ती!

नमुंमपा अतिरिक्त शहर अभियंता व शहर अभियंतापदी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी नसलेल्या व्यक्तींची नियुक्ती!

सजग नागरिक मंचाने नोंदविला तीव्र निषेध

नियुक्ती तातडीने रद्द करण्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेत शैक्षणिक दृष्टीने अपात्र व्यक्तींची अतिरिक्त शहर अभियंता व शहर अभियंता पदावर नियुक्ती झाली असल्याचा आरोप करत, या नियुक्तीचा सजग नागरिक मंचाने तीव्र निषेध नोदविला आहे. यासंदर्भात सजग नागरिक मंचने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून, नियुक्ती तातडीने रद्द करावी अशी मागणी केली आहे. नवी मुंबई -सजग नागरिक मंचाच्या वतीने नवी मुंबई महापालिकेत झालेल्या नियमबाह्य, शैक्षणिक अर्हतेला न जुमानता केलेल्या नियुक्त्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शासन निर्णय दि. ४ डिसेंबर रोजीच्या आधारे स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (बीई सिव्हील) नसलेल्या अधिकाऱ्याची अतिरिक्त शहर अभियंता (स्थापत्य) पदावर केलेली पदोन्नती ही केवळ नियमभंग नसून संपूर्ण शहराच्या स्थापत्य विकासाशी केलेली धोकादायक तडजोड ठरत असल्याने सदरील नियुक्ती तातडीने रद्द करावी अशी मागणी मंचाने राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रातून सजग नागरिक मंचाने मुख्य आक्षेप व मुद्दे मांडलेले आहेत. यात प्रामुख्याने विहित शैक्षणिक अर्हतेचा भंग : शहर अभियंता, अतिरिक्त शहर अभियंता अशा प्रमुख तांत्रिक पदांसाठी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अनिवार्य असताना, मेकॅनिकल इ. इतर शाखेच्या व्यक्तीस हे पद देणे हा स्पष्ट नियमभंग आहे. प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था या नावाखाली केलेली ही नियुक्ती शहराच्या तांत्रिक नेतृत्वाला कमकुवत करणारी आहे. २) शहर अभियंता पदावर देखील अपात्र व्यक्ती नियुक्त केली आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकापैकी जवळपास ७०% म्हणजे सुमारे ४००० कोटी खर्च स्थापत्य विभागामार्फत केला जातो. इतक्या मोठ्या निधीचा तांत्रिक निर्णय अधिकार अशा व्यक्तीकडे देणे ज्यांना स्थापत्य अभियांत्रिकीचे मूलभूत ज्ञान नाही, हा नागरिकांच्या सुरक्षिततेशी व शहराच्या विकासाशी थेट खेळ असल्याचे या पत्रातून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. वर्तमानात अतिरिक्त शहर अभियंता व शहर अभियंता या दोन्ही सर्वोच्च तांत्रिक पदांवर स्थापत्य अभियांत्रिकी पदवी नसलेल्या व्यक्तींची नियुर्ती असून, मागील काळात पदविका धारक व्यक्तीकडेही प्रभारी चार्ज देण्यात आला होता. ही तडजोड म्हणजे शहर विकासाशी केलेला स्पष्ट अन्याय असल्याची खंत मंचाचे प्रवर्तक सुधीर दाणी यांनी व्यक्त केलेली आहे .

गेल्या काही वर्षांत रस्ते, पूल, ड्रेनेज, तलाव, नाले यांची दुरवस्था, स्थापत्य कामात वारंवार तांत्रिक त्रुटी, पालिकेच्या पाण्याच्या टाक्या, इमारतीना गळती, तडे, खचणे, सतत वाढणारा दुरुस्ती खर्च, प्रत्येक पावसाळ्यात अपूर्ण किंवा फसलेली कामे ही सर्व स्थिती तांत्रिक नेतृत्वाच्या अभावामुळे आणि नियमबाह्य निर्णयांमुळे निर्माण झालेली आहे. स्थापत्य गुणवत्तेतील स्पष्ट घसरण असण्याचे प्रमुख कारण हे अपात्र अभियंत्यांची नियुक्ती असल्याचे मत मंचाने मांडले आहे. एका अपात्र अधिकाऱ्याला पदोन्नती देण्यासाठी संपूर्ण शहराची गुणवत्ता धोक्यात घालणे अव्यवहार्य आहे. एकीकडे अपात्र व्यक्तींना उच्च पदे दिली जातात तर दुसरीकडे आयआयटी तज्ञांची महागडी सल्लागार नेमणूक केली जाते, ही दुहेरी भूमिका नागरिकांच्या पैशांचा प्रश्न उपस्थित करणारी असल्याचे मंचने म्हटले आहे.

यासंदर्भात मंचने काही प्रमुख मागण्याही केल्या आहेत. यात प्रामुख्याने नियमबाह्य नियुक्ती तात्काळ रद्द करावी, शासनाने अनिवार्य बीई सिव्हिल अर्हतेचे काटेकोर पालन करून नियुक्त्या कराव्यात. शहर अभियंता पदासाठी तातडीने आयआयटी मधील स्थापत्य अभियंता नियुक्त करावा. अधिकाऱ्याला केवळ आर्थिक लाभ द्यायचा असल्यास, पद न देता वेगळा प्रशासकीय मार्ग स्वीकारावा. कुठलेही स्थापत्य कामांची जबाबदारी न देता वेतन व अन्य आर्थिक लाभ द्यावेत .भविष्यात कोणतीही नियुक्ती शैक्षणिक, तांत्रिक तडजोड करून केली जाणार नाही, याची महापालिकेने लेखी हमी करदात्या नागरिकांना द्यावी अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. दरम्यान, या विषयावर त्वरित कार्यवाही न झाल्यास कायदेशीर लढाई व जनआंदोलन उभारले जाईल असा इशाराही सजग नागरिक मंचने दिला आहे.

अन्यथा कायदेशीर मार्ग पत्करावा लागेल...

करदात्या नागरिकांच्या पैथातून केल्या जाणाऱ्या स्थापत्य कामांचा दर्जा योग्य राखण्यासाठी राज्य सरकारने पालिकेच्या शहर अभियंता पदावर आयआयटी पदवी पात्र व्यक्तीची नियुक्ती करावी. तसेच अतिरिक्त शहर अभियंता पदावर जो पर्यंत पालिकेला शासन निहित शेक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवार मिळत नाही तोवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता समकक्ष अभियंत्याची नियुक्ती करावी.अन्यथा मंचाला कायदेशीर मार्ग पत्करण्याशिवाय पर्याय असणार नाही.

- अँड. सुशांत जोशी, सजग नागरिक मंच कायदेशीर सल्लागार


Most Popular News of this Week

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...