नवी मुंबई विमानतळ नामांतरासाठी २२ डिसेंबरपासून जनआक्रोश मोर्चा!
नवी मुंबई विमानतळ नामांतरासाठी २२ डिसेंबरपासून जनआक्रोश मोर्चा!
भिवंडी माणकोलीतून नवी मुंबईत धडकणार मोर्चा; खा.बाळ्या मामांचा पुढाकार
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई विमानतळास प्रकल्पग्रस्तांचे कैवारी लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी भूमिपुत्रांच्या भावना तीव्र आहेत. तसेच नामकरणाबाबतचा प्रस्ताव मागील अडीच वर्षापासून खितपत पडला असून, केंद्र सरकारकडून याबाबत कोणताही निर्णय होताना दिसत नाही. त्यातच दि.२५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळापासून पहिल्या विमानाचे उड्डाण होणार आहे. एकंदरीत या बाबी लक्षात घेता, भूमीपुत्रांमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सुर उमटतांना दिसत असून भिवंडीचे खा. सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) यांच्या पुढाकारातून येत्या २२ डिसेंबरपासून जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्धार भूमिपुत्रांकडून करण्यात आला आहे.
याविषयी भिवंडी माणकोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना खा. सुरेश म्हात्रे यांनी सांगितले की, भूमिपुत्रांची पहिल्या दिवसांपासून एकच मागणी आहे की, नवी मुंबई विमानतळास स्व. दि.बा.पाटील साहेब यांचे नाव देण्यात यावे. कारण दि.बा.पाटील यांचे भूमिपुत्रांना विविध बाबतीत न्याय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका आहे. मात्र नवी मुंबई विमानतळास त्यांचे नाव देण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबीत आहे. केंद्राकडे राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवून सव्वा तीन वर्षे झाली आहेत. मात्र हा प्रस्ताव केंद्राकडे जैसे थे पडून आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बैठकही बोलाविली होती व त्यात विमानतळास दिबांचे नाव देण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. त्यात सरकारने येत्या २५ डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळावरून विमान उड्डाणाची घोषणा केली आहे. मात्र नामांतरणाबाबतचा कुठलाही ठराव व प्रस्ताव अजूनही कॅबिनेटमध्ये आलेला नसल्याने याबाबत भूमिपुत्रांमध्ये खदखद असून भूमिपुत्रांच्या तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे येत्या १५ दिवसांत विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव दिले नाही तर येत्या २२ डिसेंबर रोजी दिबा पाटील साहेब नवी मुंबई विमानतळ नामांतरण यामथळ्याखाली आंदोलन केले जाईल. पंतप्रधान यांनी प्रस्तावास होकार दिला आहे. मात्र अजूनही प्रस्ताव कॅबिनेटमध्ये नोट अजून निघाली नसून प्रस्ताव पडून असल्याचे खा. सुरेश म्हात्रे यांनी सांगितले. आंदोलन आम्ही करणारच आहोत. मात्र त्याची वाट न पाहता शासनाने दिलेला शब्द पाळावा असे आवाहनही त्यांनी केले. आणखी २० दिवस सरकारला दिले आहेत. अन्यथा २२ डिसेंबरला आंदोलन पक्के ठरलेले असून २० ते २५ हजार भूमिपुत्र नवी मुंबईत धडकतील असेही त्यांनी स्पष्ट केले. भिवंडीत आयोजित या बैठकीस ३० ते ३५ संघटनांचे प्रतिनिधींसह भूमिपुत्र उपस्थित होते.
तर विमानतळावरून विमान उडून देणार नाही...
लोकनेते दि.बा पाटील साहेब यांच्या नामांतरणासाठी भूमीपुत्र समाजबांधवांचा काढण्यात येणारा हा मोर्चा भिवंडी मानकोली येथून चालत निघून नवी मुंबई विमानतळावर धडकणार आहे. त्यामुळे २५ डिसेंबरच्या आत नामांतरण झाले नाहीतर विमानतळावरून कुठलेही विमान उडून देणार नसल्याचा इशारा यावेळी खा. सुरेश म्हात्रे यांनी दिला.
