कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादी (अप) गटाचा स्वबळाचा नारा
कल्याण (वार्ताहर) - स्ध्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत अनेक ठिकाणी महायुतीतील शिवसेना भाजपा स्वतंत्र लढत असून आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत देखील हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याचे संकेत मिळत आहेत. अशातच महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडे मात्र या दोन्ही पक्षांचे दुर्लक्ष होत असल्याची भावना पक्षातील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. आगामी निवडणुकीत युती करण्यासंदर्भात शिवसेना भाजपातर्फे कोणताही प्रस्ताव अद्यापपर्यंत आलेला नसल्याने तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना युतीसंदर्भात विशासात घेतलं जात नसल्याने कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्याकडे स्वबळावर लढण्याची मागणी केली आहे. मागील वर्षी झालेल्या विधानसभा आणि त्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कल्याण डोंबिवली जिल्ह्यात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे महायुतीचे काम करून महायुतीच्या उमेदवारांच्या विजयात हातभार लावला होता. मात्र आता महापालिका निवडणुकीत हि लढाई स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची असल्याने या निवडणुकीत शिवसेना भाजपाकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं अपेक्षित असतांना तसं होतांना दिसत नसल्याने सर्वसामान्य कार्यकत्यांमध्ये रोष वाढत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना आपापल्या प्रभागात कामं करत असतांना वाव मिळण्यासाठी प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जाणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गटाने स्वबळावर लढण्याची मागणी कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता नाहीतर कधीच नाही अशी भावना कार्यकर्त्यांची असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस सुभाष गायकवाड यांनी दिली.
