नवी मुंबईतून ११ महिन्यात तब्बल ४९९ मुली बेपत्ता ४९९ मुलींपैकी ४५८ मुली सुखरूप मिळाल्या तर ४१ मुली अद्यापही बेपत्ता
नवी मुंबईतून ११ महिन्यात तब्बल ४९९ मुली बेपत्ता ४९९ मुलींपैकी ४५८ मुली सुखरूप मिळाल्या तर ४१ मुली अद्यापही बेपत्ता
नवी मुंबई (प्रतिनिधी) - एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर व उपनगरांमधील शांततेचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या नवी मुंबईतून गेल्या ११ महिन्यांत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांत विक्रमी वाढ झाली असल्याचे नवी मुंबई पोलिसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. नवी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२५ ते २९ नोव्हेंबर २०२५ या ११ महिन्याचे काळात नवी मुंबईतून तब्बल ४९९ मुली बेपत्ता झाल्या आहेत. या आकडेवारीवरून नवी मुंबईत महिला कितपत सुरक्षित आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे. नवी मुंबईतून बेपत्ता झालेल्या ४९९ मुलींपैकी ४५८ मुली ह्या परत मिळाल्या असून ४१ मुली अद्याप शोधात आहेत. ही संख्या पालक, समाज आणि पोलिस यांच्यासाठी गंभीर इशारा देणारी आहे.
नवी मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गत ११ महिन्यात बेपत्ता मुलींची नोंद लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यात कोपरखेराणे, रबाळे एमआयडीसी, खारघर, तळोजा, वाशी, एपीएमसी या विभागांची स्थिती विशेषत: चिंताजनक आहे. मुली बेपत्ता होण्याच्या सर्वाधिक नोंदी असलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये कोपरखेैराणे : ४९ मुली त्यापैकी ४६ मुलींचा शोध लागला आहे तर ३ अद्याप बेपत्ता आहेत. रबाळे एमआयडीसी- बेपत्ता ४१ मुलींपैकी 3८ मुलींचा शोध लागला असून 3 मुली अद्याप बेपत्ता आहेत. खारघरमधून बेपत्ता 33 मुलींपैकी ३१ मुलींचा शोध लागला आहे तर २ मुली अद्याप बेपत्ता आहेत. तळोजातून बेपत्ता ३१ मुलींपैकी २७ मुलींचा शोध लागला असून, ४ मुली अद्याप बेपत्ता आहेत. तर एनआरआयमधून बेपत्ता झालेल्या ३० मुलींपैकी २७ मुलींचा शोध लागला असून ३ मुली अद्याप बेपत्ता आहेत. तर पनवेल शहर पोलिस ठाणे हद्दीतून बेपत्ता झालेल्या ३९ मुलींपैकी ३४ मुलींचा शोध लागला असून ५ मुली अद्याप बेपत्ता आहेत. काही भागांमध्ये संख्या कमी असली तरी घटनांचे गांभीर्य कमी होत नसल्याचे अधोरेखित होतांना दिसत आहे. बेपत्ता या ४९९ प्रकरणांपैकी पोलिसांनी मुलींच्या बेपत्ता होण्याची प्रमुख कारणांची मिमांसा केली आहे. यात कौटुंबिक तणाव आणि नातेसंबंधातील गैरसमज हा सर्वाधिक आढळलेला घटक आहे.
एकूण ४५८ शोधल्या गेलेल्या मुलींच्या तुलनेत ४१ मुलींचा शोध अद्याप गूढच असून त्यासाठी सतत शोधमोहीम सुरू आहे. पोलिसांच्या मते, बेपत्ता मुलींच्या बहुसंख्य घटना १५ ते १८ वर्षे या वयोगटात आढळतात. या वयात कोटुंबिक तणाव, मोबाईल वापर, सोशल मीडिया, नातेसंबंधातील आकर्षण, मानसिक दबाव आणि तात्कालिक रागामुळे अनेक मुली घर सोडतात. बैपत्ता मुलींच्या काही प्रकरणांत पोस्को कायद्यांतर्गतही गुन्हे नोंदवले गेले आहेत. काही मुली पोलीस ठाण्यात सापडल्या असल्या तरी त्यांना मानसिक आधार, समुपदेशन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याची गरज भासते.
दरम्यान, बेपत्ता मुलींच्या प्रकरणांमध्ये पोलिसांकडून तात्काळ शोधमोहीम राबविण्यावर भर दिला जातो. यासाठी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन ट्रेसिंग, मित्रपरिवार, सोशल मीडिया तपास, बालकल्याण समितीशी समन्वय, तक्रार मिळताच झिरो डिले नोंदणी आदी प्रकारची कार्यवाही पोलिसांकडून केली जाते. नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या, शैक्षणिक वसतिगृहांची संख्या, नोकरी-शिक्षणासाठी आलेले तरुण, सोशल मीडिया यामुळे ही आव्हाने अधिक गुंतागुंतीची बनली असल्याचे पोलिस मान्य करत आहेत.
बेपत्ता मुलींची प्रकरणे पाहता, पोलिसांकडून वारंवार विविध प्रकारची जनजागृती करण्यासह पालकांसाठी काही महत्वाच्या सुचना प्रदान केल्या जातात. यात प्रामुख्याने मुलांचा मोबाईल वापर नियंत्रित ठेवा, तक्रार करण्यास विलंब करू नका - प्रत्येक तास महत्त्वाचा, मुलांचे मानसिक आरोग्य, तणाव, मित्रपरिवार जाणून घ्या, गैरसमज वाढू देऊ नका व मुलांमध्ये संवाद ठेवा, शाळा, कॉलेजकडून उपस्थिती व हालचालीची नियमित माहिती घ्या, सायबर जागरूकता वाढवा - अनोळखी व्यक्ती, ग्रुप, चॅटपासून सावधान राहणे याबाबतच्या सुचना केल्या जात आहेत. नवी मुंबईसारख्या नियोजनबद्ध शहरात दरवर्षी शेकडो मुली बेपत्ता होणे ही फक्त आकडेवारी नाही तर समाजातील बदलत्या परिस्थितीचे गंभीर प्रतिबिंब आहे. ११ महिन्यातील बेपत्ता मुलींपैकी पोलिसांनी ९०% पेक्षा जास्त मुली शोधून काढल्या असल्यातरी ४१ मुलींचा शोध अद्यापही गुलदस्त्यात आहे. शहरातील पालक, शाळा, समाजसंस्था आणि पोलिस यांनी एकत्रित प्रयत्न न केल्यास ही आकडेवारी भविष्यात अधिक गंभीर रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवी मुंबई पोलिसांकडून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येणाऱ्या पालकांना आदरपूर्वक वागणूक देणे गरजेचे आहे. या प्रकरणांमध्ये मुलीचे पालक आधीच तणावाच्या स्थितीत असतांना त्यांना उलट सुलट प्रश्न करून आणखी संभ्रमात ठेवून भीतीचे वातावरण निर्माण करण्याऐवजी त्यांना दिलासा देण्याचे काम करणे गरजेचे आहे.
प्रेम प्रकरणातून बेपत्ता होण्याचे प्रमाण सर्वाधिक
दरम्यान बेपत्ता ४९९ मुलींच्या या कारणांमागे प्रामुख्याने प्रेम प्रकरणातून सर्वाधिक जास्त म्हणजे १२८ मुली बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. तर त्याखालोखाल पालक रागावल्याने ११४ मुली, नातेवाईकांकडे गेलेल्या १०३ मुली, फिरायला गेलेल्या ६३, मैत्रिणीकडे गेलेल्या ४८ मुली व मतिमंद, मानसिक स्थितीमुळे भटकंती १ एडीआर (अकस्मात बेपत्ता) १ यांचा समावेश आहे.
