Breaking News

नवी मुंबईतील वाढते वायूप्रदूषण धोक्याच्या वळणावर!

नवी मुंबईतील वाढते वायूप्रदूषण धोक्याच्या वळणावर!

दिर्घकालीन उपाय योजनांसाठी सजग नागरिक मंचाचे महापालिकेसह सिडको व एमपीसीबीला साकडे.

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईत वाढत्या वायूप्रदूषणाने अति धोक्याची पातळी गाठली असल्याचा आरोप सजग नागरिक मंच नवी मुंबईने केला आहे. प्रदुषणाची ही गंभीर समस्या लक्षात घेता सजग नागरिक मंच नवी मुंबईतर्फे महानगरपालिका, सिडको तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबीला) काल तातडीचे निवेदन सादर करून यासंदर्भात उपाय योजना करण्याची मागणी केली आहे.

शहरात सलग तीन वर्षे द्वितीय क्रमांकाचे स्वच्छ शहर हा पुरस्कार मिळत असतानाच, दि.२७ नोव्हेंबर रोजी बेलापूर (-एक्युआय-२३८) आणि नेरूळ (एक्युआय- २७१) येथे नोंदवले गेलेले भीषण -टख हे सरळसरळ प्रशासकीय अपयश असल्याचा आरोप मंचाने केला आहे. मंचाने स्पष्ट केले आहे की, स्वच्छ शहराचा दर्जा फक्त रस्ते व कचरा व्यवस्थापनावर आधारित नसून नागरिक श्वास घेत असलेल्या हवेलाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. सध्या नवी मुंबईतील हवेत पीएम २.५ प्रदूषकांचा प्रायघातक स्तर आढळत असून दमा, हृदयविकार, धरसनदाह, बालकांमध्ये थ्रसनबाधा यांसारख्या आजारांचा धोका गंभीररीत्या वाढला आहे. मात्र अशी एकंदरीत गंभीर परिस्थिती असतांनाही नगरपालिकेसह सिडको आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ या यंत्रणांनी या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सजग नागरिक मंचतर्फे या निवेदनातून तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबईतच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ अर्थात एमपीसीबीचे प्रादेशिक कार्यालय असतानाही हवेच्या गुणवत्तेतील घसरणीकडे दुर्लक्ष झाले, ही बाब गंभीर असल्याचे मंचाने म्हटले आहे.

नवी मुंबईतील या वाढत्या प्रदूषणामागे प्रामुख्याने आरएमसी प्लांट्स, अनियंत्रित बांधकामे, खाणी, विमानतळ प्रकल्पातील धूळ ही प्रमुख कारणे असल्याचे मंचने आपल्या तक्रारी निवेदनातून नमूद केले आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी सतत निदर्शनास आणून दिलेल्या मुद्यांवरही शासकीय स्तरावर कोणतीच ठोस कारवाई न झाल्याचा आरोप मंचने केला आहे. प्रदूषण मंडळाच्या हवाई देखरेख केंद्रांवर वारंवार इन्टरनेट इश्यू " दाखवून डेटा उपलब्ध न करणे ही बाब संशयास्पद असून तातडीची चौकशी आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

नवी मुंबईसाठी स्वतंत्र वायू प्रदूषण आपत्कालीन कृती योजना तयार करावा, प्रदूषण स्रोतांचा अभ्यास युद्धपातळीवर सुरु करून राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था सारख्या संस्थांना देणे, बांधकाम स्थळांवरील धूळ-नियंत्रणाचे कठोर नियम लागू करावे, सिडको व महापालिका क्षेत्रात यांत्रिक मार्गस्वच्छता व पाणी फवारणी वाढवावी, नियमभंग करणाऱ्या उद्योगांवर दंड व सीलबंदी, कचरा जाळणे, डीजी सेट्स, सिमेंट मिक्सर, ट्रॅफिक जॅमवर कडक कारवाई., महत्त्वाच्या चौकांवर रिअल-टाइम -एक्युआय डिस्प्ले बोर्ड बसविणे, प्रदूषण मंडळाच्या इन्टरनेट इश्यूची तपासणी करून जबाबदारांवर कारवाई करावी, नागरिकांसाठी श्वसन चिकित्सालय, प्रदूषण मदतकक्ष सुरू करावे, शहरातील लोकप्रतिनिधींनी स्वच्छता पुरस्कारांच्या पुढे जाऊन हवेच्या गुणवत्तेलाही प्राधान्य द्यावे अशा विविध मागण्या निवेदनाच्या माध्यमातून संलग्न यंत्रणांकडे केलेल्या आहेत. नवी मुंबईत वाढणारे वायूप्रदूषण ही आरोग्याची आपत्ती बनत असून तातडीची कारवाई न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल असा इशाराही मंचने दिला असून, नागरिकांच्या आरोग्यासाठी त्वरित आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याचे आवाहनही केले आहे. या निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाला देखील सादर करण्यात आली आहे. निवेदनाच्या दुसऱया प्रमुख मागणीत, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने देत असलेल्या स्वच्छ शहर” पुरस्कार प्रक्रियेत शहरातील हवेची गुणवत्ता हा निकष अनिवार्यपणे समाविष्ट करावा, अशीही मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. स्वच्छतेचा पुरस्कार आणि प्रदूषित हवा ही विसंगती थांबलीच पाहिजे, असे मंचाचे म्हणणे आहे.

दीर्घकालीन उपाय योजना राबविणे गरजेचे...

सामाजिक आरोग्य स्वास्थ्याच्या दृष्टीने धोकादायक प्रदूषित हवा नियंत्रण व हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तात्कालिक व दीर्घकालीन उपायोजना महापालिका, सिडको व प्रदूषण मंडळाने संयुक्तपणे योजाव्यात. निरोगी आरोग्यासाठी स्वच्छ हवा हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याने त्याची पूर्तता करणे हे प्रशासकीय यंत्रणांचे संविधानिक उत्तरदायित्व ठरते. - सुधीर दाणी, प्रवर्तक सजग नागरिक मंच नवी मुंबई


Most Popular News of this Week