भिवंडी मनपाचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर
भिवंडी मनपाचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर
भिवंडी (वार्ताहर) - भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरामध्ये एकूण ९२ प्राथमिक व ११ माध्यमिक शाळा सुरु आहेत. सदर विद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५- २०२६ मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक उपाय योजना करण्यासाठी काल दि.२७ नोव्हेंबर २०२५ रोजी भिवंडी महालिका शिक्षण विभागाची आढावा बैठक आयुक्त तथा प्रशासक अनमोल सागर यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये आयुक्त अनमोल सागर यांनी महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी गळती, अध्ययन स्तरानुसार आध्यापन, पॅट परीक्षा अहवाल, असर अहवाल, निपूण भारत अहवाल इत्यादी बाबत सविस्तर आढावा घेतला. यावेळी शाळांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन निधीतून प्रस्ताव सादर करण्याबाबत तसेच, अनुषंगिक विविध बाबींवर सूचना आयुक्तांनी दिल्या. महापालिकेच्या शिक्षण विभागातील शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्याच्या अनुषंगाने इयत्ता 3 री व पाचवीच्या विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर तपासणे करीता वरिष्ठ अधिकाऱ्यांचे भरारी पथक स्थापन करण्याचे आदेशही आयुक्त यांनी यावेळी दिले. सदर बैठकीमध्ये महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनामध्ये प्रोटीनयुक्त आहार व फळांचा समावेश करण्याबाबतच्या तसेच शाळांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन निधीतून प्रस्ताव सादर करण्याबाबत तसेच इतर अनुषंगिक विविध बाबींवर सूचना आयुक्तांनी दिल्या. या बैठकीकरीता अतिरिक्त आयुक्त नयना ससाणे, उप-आयुक्त (शिक्षण) बाळकृष्ण क्षीरसागर, प्रशासनाधिकारी सौदागर शिखरे व शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कमी निकाल असणाऱ्या शाळा मुख्याध्यापकांवर होणार कारवाई
ज्या शाळांमधील पॅटचा निकाल सर्वसाधारणपेक्षाही कमी आहे, अशा शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. तसेच, ज्या शाळांची दुरावस्था झाली आहे अशा शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन त्याबाबत अहवाल तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
