बदलत्या हवामानाचा फटका... फ्लेमिंगो विसरले नवी मुंबईची वाट!
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईतील खाडी किनारा परिसर हा परदेशी पाहुण्यांसाठी अर्थात फ्लेमिंगोंसाठी महत्वाचे ठिकाण आहे.या कारणामुळे नवी मुंबई शहराला फ्लेमिंगो सिटी असेही म्हटले जाते. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात या परदेशी पाहुण्यांचे नवी मुंबईच्या खाडी परिसरात आगमन होत असते. मात्र यंदा नोव्हेंबर महिना संपण्याच्या वाटेवर असतांनाही हे परदेशी पाहुणे अद्यापी नवी मुंबईत दाखल झाले नसल्याने परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगा नवी मुंबईची वाट विसरले असल्याचे स्पष्ट होत आहे. नवी मुंबईत फ्लेमिंगोंचे आगमन उशिरा झाले आहे. हवामान बदलामुळे स्थानिक परिसंस्थेवर ताण येत असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. या उशिरा आगमानाचे कारण म्हणजे लांबलेला पावसाळा आणि त्यानंतरच्या सरी हे असल्याचे बोलले जाते. फ्लेमिंगो हे शहराच्या पाणथळ जागांच्या आरोग्याचे महत्त्वाचे सूचक आहेत.नवी मुंबईला खाडी परिसर लाभला असल्याने दरवर्षी नोव्हेंबरमध्ये लाखोंच्या संख्येने परदेशी पक्षी स्थलांतर करून येतात. त्यामुळे नोव्हेंबरपासून जानेवारी फेब्रुवारीपर्यंत हा परिसर या पक्ष्यांच्या मोहक अदांनी खुललेला असतो. मात्र, यंदा अद्यापी परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले असल्याने दूरदेशीचे हे पाहुणे नवी मुंबईची वाट विसरले असल्याचे दिसते.नवी मुंबईतील खाडी परिसरात नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत मोठ्या प्रमाणात हे परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो पक्षी येत असतात व फ्लेमिंगो पक्ष्यांच्या या आगमन पाहण्यासाठी खाडी परिसरात पक्षीप्रेमी, अभ्यासक व पर्यटकांची गर्दी होत असते. त्यामुळे नवी मुंबई शहराला फ्लेमिंगो सिटी असेही म्हटले जाते. मात्र यंदा अजूनपर्यंत हे पाहुणे दाखल झाले नसल्याने पक्षीप्रेमी नागरिक त्यांची चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहत आहेत.
फ्लेमिंगोंचे उशीरा येणे धोक्याची घंटा
नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी सांगितले की, फ्लेमिंगो हे निरोगी पर्यावरणाचे दूत आहेत. जेव्हा ते मोठ्या संख्येने येतात, तेव्हा याचा अर्थ पाणथळ जागा जिवंत आहेत. त्यांचे उशिरा येणे आणि कमी होणारी संख्या धोक्याची घंटा आहे. कुमार यांनी यावर जोर दिला की, हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी पाणथळ जागांचे संरक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे. किनारी शहरांमध्ये, जिथे अतिवृष्टी, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणे यांसारख्या समस्या रोजच्या बनल्या आहेत, तिथे पाणथळ जागा या ऐच्छिक नाहीत. त्या हवामानापासून संरक्षण देणाऱ्या नैसर्गिक भिंती आहेत.
