Breaking News

नवी मुंबई एसीबीची सिडकोत धडक कारवाई लाच घेतांना अप्पर जिल्हाधिकारी अटकेत

नवी मुंबई एसीबीची सिडकोत धडक कारवाई लाच घेतांना अप्पर जिल्हाधिकारी अटकेत

नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) काल सिडकोत धडक कारवाई करत अप्पर जिल्हाधिकारी तथा सिडको भूमी व भूमापन अधिकाऱ्यास २२ हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. राज्याचे सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून ओळख असलेल्या सिडकोच्या कार्यालयातच अप्पर जिल्हाधिकारी पदावरील एका बड्या अधिकाऱ्यास लाच प्रकरणात अटकेला सामोरे जावे लागल्याने नवी मुंबईत विशेषकरून सिडको महामंडळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सिडकोचे भूमी व भूमापन मुख्य अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी रामदास हरिभाऊ जगताप (५७) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जगताप यांना २२ हजार रुपयांची लाच घेताना काल एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सिडकोच्या २२.५ टक्के योजनेतील जमिनीच्या रजिस्ट्रेशनचे काम करण्यासाठी सिडकोचे भूमी व भूमापन मुख्य अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी असलेले रामदास जगताप यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने नवी मुंबई अँटी करप्शनकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी अंती नवी मुंबई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या पथकाने सापळा रचला असता, जगताप यांच्या सूचनेनुसार शिपायाने सदरची ही लाचेची रक्कम स्वीकारली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई एसीबीने लाच प्रकरणात धडक कारवाई केल्या आहेत. यापूर्वी काही दिवसांपूर्वी नवी मुंबई एसीबीने नवी मुंबई महापालिका मुख्यालयात लावलेल्या सापळ्यात महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त कैलास गायकवाड यांना लाच घेतांना रंगेहाथ पकडले होते. ही घटना विस्मरणात जात नाही तोच आता सिडकोचे भूमी व भूमापन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी जगताप यांना लाच घेतांना सिडको कार्यालयातच रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सिडकोत यापूर्वी भ्रष्टाचाराच्या समोर आलेल्या विविध प्रकरणांमुळे राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाणारे सिडको हे महामंडळ भ्रष्टाचाराचे कुरण बनले असल्याचे बोलले जात असतांनाच आता सिडकोचे भूमी व भूमपान अधिकारी असलेले जगताप यांना लाच प्रकरणात अटकेला सामोरे जावे लागल्याने सिडकोत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सिडकोच्या जमिनीशी संबंधित विभागातील या कारवाईमुळे सिडको वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एसीबीने तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


Most Popular News of this Week