होळी व धुळवडीनिमित्त नवी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त...
मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची धरपकड
बेलापूर (वार्ताहर) - होळी आणि धुळीवडीच्या सेलिब्रेशनला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीत पोलिस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सतर्क राहत, चोख बंदोबस्त ठेवला होता. होळी व धुळवडीचा सण साजरा करताना शहरात कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात आली होती. विशेषकरून जास्तीत जास्त ठिकाणी नाकाबंदी लावून मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱयांची धरपकड पोलिसांकडून केली जात होती. धुळवडीला फुगे, रंग फेकणाऱ्यांना पोलिसांनी ताकीद दिली होती. तसेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कुणी प्रयत्न केल्यास त्याच्यावर कारवाईचा इशारा पोलिसांनी देण्यासह संपूर्ण नवी मुंबईत कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्याने होळी व धुळवडीच्या सणाला कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता हा सण नवी मुंबईत उत्साहात पार पडला.
सार्वजनिक स्वरूपाच्या होळ्या पेटवण्याच्या ठिकाणी गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणे, गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवून मारामारी, महिला, मुलींच्या छेडछाडीचे प्रकार अथवा इतर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची विशेष दक्षता पोलिसांकडून घेतली जात होती. मद्यपान करून सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्यांवर पोलिसांचा विशेष वॉच होता. त्याचबरोबर जास्तीत जास्त ठिकाणी नाकाबंदी लावून मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची धरपकड करण्याचे आदेश सर्व पोलिसांना देण्यात आले होते.
