Breaking News

हिंद दी चादर शहिदी समागमनिमित्त नवी मुंबईत सलग १५ दिवस आरोग्य शिबीरे

हिंद दी चादर शहिदी समागमनिमित्त नवी मुंबईत सलग १५ दिवस आरोग्य शिबीरे


बेलापूर (वार्ताहर) - महाराष्ट्र शासनाच्या वतीने हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या 3५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त अत्यंत भव्य स्वरुपातील कार्यक्रम दि.२८ ते 0१ मार्च २०२६ या कालावधीत से-२९ खारघर येथील ओवे मैदानात सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. श्री गुरु तेगबहादूर साहिब यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहित व्हावा यादृष्टीने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापौर सुजाता पाटील व महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने समन्वयक अधिकारी असणार असून संबंधित विभागप्रमुखांकडे जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.


या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि.१० फेब्रुवारी, ते २५ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत नमुंमपा आरोग्य विभागाच्या वतीने विशेष आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेची सर्व रुग्णालये आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्यामार्फत कार्यक्षेत्रामध्ये २५ फेब्रुवारी पर्यंत १२४ शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून त्यामध्ये, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या निदानासाठीची तपासणी करणे. तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या तोंडाच्या कर्करोग निदानासाठीची तपासणी करणे, माता व बाल आरोग्य आणि लसीकरण, क्षयरोग होण्याची अतिजोखीम असलेल्या महिलांची क्षयरोग निदानासाठीची तपासणी करणे. सिकलसेल रोग तपासणी करणे आदी तपासण्या करण्यात येत आहेत. याकरिता अनुभवी स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, कान नाक व घसा रोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक अशा तज्ज्ञांच्या सेवा दिल्या जात आहेत.

या आरोग्य शिबीरांच्या अनुषंगाने काल दि.१० फेब्रुवारी रोजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे यांच्या नियंत्रणाखाली महापालिकेच्या वाशी व नेरुळ रुग्णालयात तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वाशी आणि नेरूळ २ या ठिकाणी आयोजित विशेष आरोग्य शिबीरांना नागरिकांचा, विशेषत्वाने महिलांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद लाभला.



Most Popular News of this Week