Breaking News

एपीएमसी फळ मार्केटच्या एक्सपोर्ट इमारतीला आग

एपीएमसी फळ मार्केटच्या एक्सपोर्ट इमारतीला आग

अम्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची व्यापाऱ्यांकडून मागणी

तुर्भ (वार्ताहर) - नवी मुंबईत आगीच्या घटना अधूनमधून घडत असतांनाच काल एपीएमसी फळ मार्केटच्या एक्सपोर्ट बिल्डिंगच्या तळ मजल्यावर भीषण आग लागण्याची घटना घडली. आगीच्या या घटनेनंतर या परिसरात एकच खळबळ उडण्यासह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, एपीएमसीत सातत्याने अधूनमधून आगीच्या घटना घडत असल्याने येथील अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असल्याने अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून जोर धरू लागली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या वेल्डिंगच्या कामादरम्यान उडालेली ठिणगी तळ मजल्यावरील टुकानांमध्ये साठवून ठेवलेल्या प्लास्टिक कॅरटवर पडल्याने सदरची आग लागली व पुढे ही आग वाढत गेली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दोन अग्निशामक बंब दाखल होवून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते.मात्र, अतिक्रमण, पॅसेजमध्ये साठवलेले कॅरेट, पुडा व इतर ज्वलनशील साहित्य तसेच स्वच्छतेच्या अभावामुळे अग्निशमन पथकांच्या बचाव कार्याला अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान, याच इमारतीत यापूर्वीही आगीच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्यानंतरही एपीएमसी प्रशासनाकडून कोणतेही ठोस प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले नसल्याचा गंभीर आरोप यावेळी व्यापाऱ्यांकडून करण्यात आला. आगीच्या या घटनेनंतर येथील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण तसेच अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.


Most Popular News of this Week