Breaking News

नवी मुंबईत आचारसंहिता पालनावर महापालिकेचा भर; अनधिकृत बॅनर्ससह फेरीवाले, बेवारस वाहनांवर कारवाई...

नवी मुंबईत आचारसंहिता पालनावर महापालिकेचा भर; अनधिकृत बॅनर्ससह फेरीवाले, बेवारस वाहनांवर कारवाई...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता सर्वत्र लागू झाल्यानंतर आचारसंहितेच्या नियमांचे उल्ल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त कैलास शिंदे यांनी आढावा बैठकीत दिले आहेत. त्यानुसार शहरातील अनधिकृत जाहिराती, बॅनर्स व पोस्टर्स हटविण्याची मोहीम नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत हाती घेण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकांकडून कामकाजाचे नियोजन करून आठही विभाग कार्यक्षेत्रात बेकायदा होडिंग काढण्यासह नामफलक झाकण्यासही सुरुवात केली आहे. सोमवारी आचारसंहिता जाहीर होताच तात्काळ अनधिकृत होडिग व बॅनरविरोधात मोहीम तीव्र करण्यात आली. यात बेकायदा होडिंग व बॅनर हटविण्यासह भित्तीपत्रके व राजकीय प्रचाराचा मजकूर झाकण्यास प्राधान्य दिले आहे. तसेच उदघाटन व भूमिपूजनाच्या नामफलकाच्या पाट्या झाकण्यासही सुरुवात केली. यात विशेष म्हणजे आचारसंहिता सुरु झाल्यापासून २४ तासाच्या आत दिघा विभागात २४ बॅनर हटविण्यासह १४ नामफलक झाकण्यात आले. तसेच कोपरखेरण्यात बेवारस वाहनांसह फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. काल दि.१८ डिसेंबर रोजी बेलापूर व कोपरखैरणे विभाग कार्यक्षेत्रात बेकायदा फेरीवाल्यांवर तर तुर्भे विभाग कार्यक्षेत्रात रस्त्यावर पडून राहणाऱ्या बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात आली. कारवाईची ही मोहिम यापुढेही सुरुच ठेवण्यात येणार आहे.

- चौक, रस्ते घेवू लागले मोकळा श्‍वास -

दरम्यान, नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी महापालिकेकडून हाती घेण्यात आलेल्या या कारवाईच्या मोहिमेमुळे इतर वेळेला बेकायदा बॅनर्सने वेढलेले चौक, फेरीवाल्यांवरील व बेवारस वाहनांवरील कारवाईमुळे शहरातील रस्ते चौक आता मोकळे श्‍वास घेवू लागले आहेत.


Most Popular News of this Week