वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश
नवी मुंबई - नवी मुंबईच्या पर्यावरणाकडे विशेष लक्ष देण्याच्या दृष्टीने वायू प्रदूषणावर प्रतिबंध आणण्याकरिता बांधकाम साईट, दगड खाणी, सिमेंट निर्मितीचे आरएमसी प्लान्ट याकडे प्राधान्याने लक्ष दयावे व त्यासोबतच वाहनांमुळे होणारे प्रदूषण, तंदूर भट्टयांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यासाठीही प्रयत्न करावेत असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीप्रसंगी दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे आणि विभाग प्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.
थंडीमुळे व वायू प्रदूषणामुळे हवेतील धुरके (SMOG) वाढले असून ते कमी होण्यासाठी सतर्कता राखत ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज विशद करीत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी शहरात सुरु असलेल्या बांधकाम साईट्सवर धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपरणे राबविल्या जात असल्याची प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करावी व त्यामध्ये त्रुटी आढळल्यास साईटवरील बांधकाम आठवडयाभरासाठी बंद करावे असे निर्देश दिले. याकरिता नगररचना विभाग व विभाग कार्यालयातील अभियंत्यांनी आपापल्या क्षेत्रातील बांधकाम साईट्सवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व त्याचा अहवाल जलद सादर करावा असे निर्देशित केले.
सध्या वारा वाहण्याचे प्रमाण कमी झाले असल्याने हवेतील धुरके वाढले असून त्यावर नियंत्रणासाठी मुख्य रहदारीचे रस्ते व एमआयडीसी क्षेत्रातील रस्ते याठिकाणी रस्त्यांच्या कडेला असलेली माती वाहनांच्या वेगामुळे हवेत उडून धुळीचे प्रमाण वाढते हे लक्षात घेत ती साफ करावी व उचलून नेण्याची धडक मोहीम राबवावी असेही निर्देशित केले. अशाप्रकारे रस्त्यांच्या कडेची माती साफ करण्याची प्रक्रिया दर 15 दिवसांनी राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. कॉरी साईट्स व सिमेंट निर्मितीचे आरएमसी प्लांट याठिकाणीही प्रदूषण प्रतिबंधाचे नियम पाळले जात असल्याची प्रत्यक्ष पाहणी करून खातरजमा करावी व अहवाल दयावा असे आयुक्तांनी निर्देशित केले. अशाच प्रकारे बेकरीत कोळशाचा वापर होत असेल तर तो बंद करावा तसेच तंदूरसाठी हॉटेलमध्ये होणाऱ्या कोळशाच्या वापरासही प्रतिबंध करावा, त्याचप्रमाणे कुठे कचरा जाळला जात असेल तर त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी असे आयुक्तांनी सूचित केले. दैनंदिन स्वच्छतेमध्ये गावठाणातील कचरा संकलनाकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्याकडे गावठाणांच्या कार्यक्षेत्राची जबाबदारी सोपवून गावांच्या अंतर्गत भागातील कचरा संकलन कसे होईल याचे नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. बायलेन स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले.
हा पानगळतीचा ऋतू असल्याने पानांचा कचराही गोळा केला जावा व तो कुठल्याही परिस्थितीत जाळला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे या हरित कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी उदयानातील चारही कोपऱ्यात कंपोस्ट पीट असावेत असे आयुक्तांनी निर्देश दिले.
पर्यावरण संरक्षरणाच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे बनविण्यात आलेल्या गॅस शवदाहिनी व विदयुत शवदाहिनी वापरात आणून स्मशानभूमीतही पर्यावरणपूरक संकल्पना राबवावी व त्यासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करावे असे आयुक्तांनी सूचित केले.
--------------
बेघर व फेरीवाले ही सुनियोजित शहराच्या दृष्टीने मोठी समस्या असून सातत्याने कारवाई करणे हाच प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम सुरु असलेल्या अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई प्रभावीपणे राबवावी तसेच विनापरवानगी बॅनर व पोस्टर्सवरही कायदेशीर कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले.
---------------
नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत मा.राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कालबध्द कार्यक्रमानुसार प्रारुप मतदार यादीबाबत आलेल्या हरकती व सूचना तपासण्याचे काम विहीत वेळेत बारकाईने करावे असे निर्देश देतानाच दुबार नावांबाबतची मोहीम अतिरिक्त मनुष्यबळ वापरून काळजीपूर्वक पूर्ण करावी असे आयुक्तांनी निर्देशित केले. त्यासोबतच मतदान केंद्रांच्या जागांची पाहणी करावी व तेथील आवश्यक सेवासुविधा पूर्ततेचे नियोजन करावे त्याचप्रमाणे प्रत्येक विभागाकरिता निवडणूक केंद्राच्या संभाव्य जागांची पाहणी करुन त्या निश्चित कराव्यात व त्या जागा निवडणूक कामासाठी अधिग्रहीत करावयाच्या असल्याने त्या कौटुंबिक, सामाजिक उपक्रमांसाठी आरक्षित करता येणार नाहीत असे जाहीर करावे, जेणेकरुन नागरिकांना त्याबाबत माहिती मिळेल व त्यांना या जागा वगळून आपल्या कार्यक्रमांचे नियोजन करता येईल अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.
---------------
नागरी सेवा सुविधांबाबत अभियांत्रिकी विभागाला स्पष्ट निर्देश देताना कामाची गरज लक्षात घेऊनच सुविधा काम प्रस्तावित करावे असे आयुक्तांनी सांगितले. त्याचप्रमाणे बांधकामाच्या दर्जाशी कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
विविध सेवा पुरविण्यासाठी रस्ते खोदले जातात या बाबीकडे गंभीर लक्ष देत नव्याने निर्मिती झालेला रस्ता कोणत्याही कारणासाठी खोदला जाणार नाही असे स्पष्ट करीत कोणत्याही कारणासाठी रस्ता खोदण्यासाठी आयुक्तांची परवानगी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.
खड्डेमुक्त रस्ते हे आपले प्राधान्याने लक्ष्य असून त्यादृष्टीने सुरु असलेल्या कामांना वेग दयावा आणि पुढील 15 दिवसांत हे काम पूर्ण करुन तसा अहवाल सादर करावा असे सर्व विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निर्देश देण्यात आले.
नवी मुंबईची पर्यावरण स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने प्राधान्याने वायू प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याकडे काटेकोर लक्ष दयावे असे निर्देशित करतानाच नागरिकांमध्येही पर्यावरणविषयक जागरुकता निर्माण करण्यासाठी तसेच त्यादृष्टीने काळजी घेण्यासाठी जनजागृती करण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्याकडून निर्देश देण्यात आले.
Most Popular News of this Week
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
